सह्याद्री अतिथीग्रहाचा स्लॅब जसा कोसळला तसेच महाआघाडी सरकारही कोसळेल – प्रवीण दरेकर

मुंबई : ५ जून – सह्याद्री अतिथिगृहाचा स्लॅब काल कोसळला होता. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सह्याद्री अतिथिगृहातील स्लॅब कोसळला तसे राज्यातील आघाडी सरकार कधी कोसळले तेही कळणार नाही, तसे संकेत आहेत, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.
राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले आहे. त्यावरही दरेकर यांनी मत व्यक्त केले. अनलॉकबाबत काढण्यात आलेले परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढले आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असे दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत सरकारवर सडकून टीका केली.
वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही दरेकरांनी केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे, आम्हाला फ्रस्टेशन कशाचे? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असे दरेकर म्हणाले.

Leave a Reply