देशाचा जीडीपी निश्चितपणे सुधारेल, भाजपाचे प्रवक्ते सीए मिलिंद कानडे यांचा आशावाद

नागपूर : ५ जून – कोरोनासारख्या जागतिक महामारीचा फटका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. भारताच्या सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) दराने चार दशकांतला निचांक गाठला आहे. पण आपण ज्या सकारात्मकतेने कोरोनाचा सामना केला तोच सकारात्मक भाव ठेवला तर लवकरच आपला जीडीपी सुधारेल, असा आशावाद भाजपाचे प्रवक्ते व इकॉनॉमिक सेलचे अध्यक्ष सीए मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला आहे.

मिलिंद कानडे म्हणाले, जून 2020 च्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीचा दर – 24.4 टक्के जो मार्च 2021 च्या तिमाहीत वाढून + 1.6 इतका झाला. 2020-21 या आर्थिक वर्षात विकास दर – 7.5 असा अंदाज आधीच राष्‍ट्रीय स्‍तरावर वर्तवला गेला होता. त्‍यामुळे – 7.3 हा विकासदर काही धक्‍का नाही, असे ते म्‍हणाले.
भांडवली अर्थव्‍यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी असे चक्र कायम सुरू असते. त्यामुळे ही मंदी केवळ मोदी सरकारमुळे आली, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यावर ओपन मार्केट, सिलेक्टेड क्रेडिट कंट्रोल, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसीचा योग्य तो वापर करून रिझर्व बँक आणि केंद्र सरकार दोघे मिळून या मंदीवर मात करण्‍याचा निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त‍ केला.

कृषी, सेवा आणि वस्तू क्षेत्र असे तीन क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्था चे घटक आहेत. त्या‍तल्या वस्तू क्षेत्रामध्ये उपभोगाच्या वस्तू आणि भांडवली वस्तूंचे उत्पादन होते. सध्या केवळ उपभोगाच्या वस्तूच तेवढ्या वापरल्या जात आहेत. भांडवली वस्तूंचे उत्पादन ठप्‍प आहे. ‘मिशन बिगिन’ अंतर्गत भांडवली वस्तूंचे उत्पादन सुरू होईल. त्‍याद्वारे जास्‍त उपयोगाच्‍या वस्‍तू वापरल्‍या जातील आणि आर्थिक रोजगार निर्मिती होईल, असे मिलिंद कानडे म्हणाले.

कोरोनाच्‍या प्रादूर्भावामुळे जगभरात ब-याच अर्थव्‍यवस्‍था कोलमडल्‍या आहेत. भारतीय अर्थव्‍यवस्‍था ही जगातल्‍या इतर अनेक अर्थव्‍यवस्‍थांशी जोडलेली असल्‍यामुळे स्‍वाभाविकपणे आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर त्‍याचा ताण पडला आहे. बंदीसदृश्‍य टाळेबंदीमुळे उत्‍पादन ठप्‍प झाले, क्रयविक्रयावर बंधने आली व सेवा पुरवठा थांबला. पण भारतामध्‍ये उत्‍पादनाच्‍या स्थापित क्षमता आधीपासूनच आहेत आणि सेवा पुरवठादार सेवा पुरवण्‍यास सक्षम आहेत. त्‍यामुळे टाळेबंदी जसजशी शिथील होईल तशी मागणीत वाढत होईल आणि योग्‍य पुरवठ्याचा समन्‍वय साधला जाईल. सरकार द्वारा केला जाणरा खर्च , गुणतवनुक आणि उत्पन्न गुणकाचा परिणाम यान्‍वये राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नात वाढ होईल, असेही मिलिंद कानडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply