महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे प्रत्येक फेसबुक लाईव्ह मध्ये महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाचे नियम पाळायचा आग्रह धरतात तुम्ही नियम पळाले नाही तर मला नाईलाजाने अजून कडक निर्बध लावावे लागतील, असा धमकीवजा इशाराही ते महाराष्ट्रातील जनतेला देत असतात. कोरोनाची साखळी तोडावी म्हणून त्यांनी लग्नसमारंभात ५० व्यक्तींचे बंधन घातले आहे. तर अंत्यसंस्काराला २० माणसांना परवानगी दिलेली आहे. सार्वजनिक समारंभही बंद करायला त्यांनी सांगितले आहे.
मात्र लोकांना दम भरणारे उद्धवपंत स्वतःच आपले नियम कसे गुंडाळून ठेवतात याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरतो आहे. काल उद्धवपंतांनी मुंबईतल्या मेट्रोला एका टप्प्यावर हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मेट्रोच्या फ्लॅटफॉर्मवर उद्धवपंतांसोबत किमान २०० लोक तरी असावेत असे व्हिडीओ पाहिल्यावर जाणवते. यावेळी पोलीस आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. याशिवाय इतर मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कार्यकर्तेही होते. या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगच्या तत्वाची पार ऐशीतैशी केल्याचेही व्हिडीओ बघून जाणवते आहे. उद्धवपंतांसोबत त्या गर्दीत एखादाही सुपर स्प्रेडर असेल तर मग सगळ्यांचीच वाट लागली म्हणावे लागेल.
उद्धवपॅंट आपल्या भाषणात नेहमी स्वतःला महाराष्ट्राचे पालक म्हणवून घेतात मधल्या काळात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताच कसा गोंधळ उडाला त्याचा अनुभव उभ्या महाराष्ट्राने घेतला आहे. अश्या वेळी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवण्याचे काम उद्धवपंतांना आभासी पद्धतीनेही करता आले असते. मात्र ते मेट्रो स्टेशनवर गेले. मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे हा कार्यक्रम आभासी पद्धतीनेच घ्या असा निश्चित आग्रह धरू शकले असते मात्र, असा आग्रह का धरला नाही? याचे उत्तर तेच देऊ शकतात.
एकूणच लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असा हा प्रकार झाल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्रीपद हे जबाबदारीचे पद आहे तिथल्या माणसाने स्वतःचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा विचार करायचा असतो एरवी फारसे घराबाहेर न निघणारे उद्धव ठाकरे इतक्या गर्दीत मेट्रो स्टेशनवर पोहोचले यामागे येणाऱ्या महापालिका निवडणूका तर कारणीभूत नाहीत ना? अशी शंका घेतली जात आहे.
आपण कोणतीही गोष्ट इतरांना करायला सांगतो तेव्हा आधी आपण ती केली पाहिजे असे अपेक्षित असते. आधी केले मग सांगितले असे तत्व पाळावे असे आपले वाडवडील शिकवतात इथे मात्र उद्धवपंतांनी मी फक्त सांगणार करणार नाही अशीच भूमिका घेतलेली दिसते. थोडक्यात काय तर लोक सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही म्हण उद्धवपंतांनी आजतरी सार्थ ठरवलेली आहे.
कालचा हा व्हिडीओ पंचनामाच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. आपण https://youtu.be/mjUsqoK8lm0 या लिंकवर क्लिक करून खरे काय ते बघू शकता .
अविनाश पाठक