चारचाकी गाडीतून ४४ किलो गांजा जप्त

अकोला : १ जून – अमरावती येथून चार चाकी गाडीत गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती येथील दहशतवाद विरोधी विभागाला मिळाली. त्यांनी लावलेल्या सापळ्यात ही गाडी सापडली असून त्यातून ४४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडीसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
अमली पदार्थांची वाहतूक अकोला शहरापर्यंत होत आहे. पिकअप व्हॅन द्वारे चारचाकी गाडीतून गांजाची तस्करी करण्यात येत होती. अमरावती येथून चारचाकी वाहन एपी04 जीए 8509 ज्यामध्ये मादक अमली पदार्थ आणला गेला. अकोल्यात हमजा प्लॉट मध्ये विक्री करण्यासाठी आरोपी इरफानखान जमीरखान हा आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मानव शोरूम जवळ नाकाबंदी करून हे चारचाकी वाहन पोलिसांनी पकडले. पोलिसांना पाहून वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनात इरफानखान जमीरखान वय 30 वर्ष याच्या ताब्यातील 44 किलो मादक अमली पदार्थ गांजाची 04 पोते भरलेली ज्याची किंमत चार लाख 44 हजार आणि पीकअप व्हॅन किंमत सहा लाख असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुनेशहर पोलिस स्टेशन अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर या प्रकरणातील वाहनचालक कसा काय पळून गेला अशी चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरु होती.

Leave a Reply