खुडू नका कुणी कलिकांना !
आपल्या हिंदू पंचांगात दरवर्षी
संक्रांतीचं वर्णन असते
ती इशान्येकडून येते नैऋत्येकडे जाते
पूर्वेकडे पहाते , वगैरे वगैरे ..
त्याप्रमाणे ज्योतिषी त्या वर्षीचं भविष्य वर्तवित असतात
तद्वतच हे औषधीशास्त्रातले हे बाजारबडवेही कोरोनाचं भविष्य वर्तवताहेत !
काय तर म्हणे आता तिसरी लाट येणार आहे ! आणि ,
ती म्हणे फक्त लहान मुलांना ग्रासणार आहे !
कशावरून ? आणि कां म्हणून लहान मुलेच ?
तुम्हाला काय अशी आकाशवाणी वगैरे ऐकू आली कि काय ?
कि तुमची संपत्तीची भूक अजून शिल्लक आहे म्हणून कि काय ?
आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कि,
आमचं घर, दार, पैसा, उरलीसुरली शिल्लक, सारं काही न्या , पण ,
आमच्या चिमुकल्यांच्या जिवांशी
खेळू नका !
इतकी प्रचंड कमाई केल्यानन्तरही
तुमची भूक शमली नसेल तर ,
आम्ही वर्गणी करून तुमच्या खात्यात भरू !
पण, आमच्या या कच्च्या कळ्यांना
कृपा करून नका हो खुडू !
कवी -- अनिल शेंडे .