पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थानी केली हत्या

अकोला : ३१ मे – अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची शासकीय निवासस्थानी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी हत्या केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. पण घरात सांडलेल्या रक्तावरून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही हत्या नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.
संबंधित हत्या झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव सुरेश भोजने असून ते तेल्हारा पंचायत समितीत चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. मागील काही वर्षांपासून ते आपल्या पत्नी आणि मुलासोबत तेल्हारा पंचायत समितीच्या वसाहतीमध्ये राहत होते. काल (रविवार) 30 मे रोजी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला आहे. प्रथमदर्शीनी ही आत्महत्या वाटत होती, पण हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वृत्तानुसार, मृत भोजने यांच्या गळ्याला लावलेला फास पूर्णपणे टेकला नव्हता. दोरखंड आणि भोजने यांच्या मानेत बरंच अंतर होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय पंचनाम्यादरम्यान पोलिसांना भोजने यांच्या गळ्यावर दोन व्रण देखील आढळले आहेत. एवढेच नव्हे तर ज्या खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता, त्या खोलीत बऱ्याच ठिकाणी रक्त देखील सांडलं आहे. शिवाय घरातील काही सामान देखील अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसनू घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरु केला आहे.
तेल्हारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, त्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply