गडचिरोलीत महिलेची हत्या

गडचिरोली : ३१ मे – गडचिरोली जिल्ह्यात महिला हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आल्लापल्ली इथं प्रभाग क्र. 2 मधील भेदके वाडा वस्तीत एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर हत्या काल दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान झाली असावी असा अंदाज घरमालकाने दिलेल्या माहितीच्या आधारवर व्यक्त केला जात आहे. इतकंच नाहीतर, पत्नीची हत्या करून पती पळून गेला असा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतक महिलेचे नाव सुशिला गोपीचंद मडावी वय 43 असं आहे. सुशिला या भामरागड तालुक्यातील कोठी इथल्या असून त्या मागील दोन महिन्यांपासून आपल्या पती सोबत आल्लापल्लीत वास्तव्यास राहत आहेत. आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी रोजंदारीच्या कामावर जात होती.

दरम्यान आज शेजारच्यांना दुर्गंध आल्यामुळे काही नागरिकांनी घराचे दार उघडले असता महिलेचा मृतदेह आढळला आणि याबाबतची माहिती पोलीस स्टेशन अहेरी इथं देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. मृतक महिलेचा पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे करत आहेत.

Leave a Reply