नागपूर : ३० मे – राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. या सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधत ओबीसी आरक्षणावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारेच ओबीसींना आरक्षण दिलं. त्यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
सर्वाच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली नाही. हे दुटप्पी सरकार आहे. ओबीसींच्या मतांवर हे सरकार आलं. मात्र ओबीसींवरच अन्याय करत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नाशी केंद्राचा संबंध येत नाही. हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार खोटं बोलत आहे. सरकारने तातडीने डाटा तयार करावा. एका महिन्यात आयोग स्थापन करून तीन महिन्यात डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.