वाशिम : ३० मे – मोबाईल हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर हा जीवावर सुद्धा बेतू शकतो. वाशिममध्ये एका शेतकऱ्याने खिश्यात मोबाईल ठेवला होता पण अचानक काही वेळानंतर मोबाईल फोनने पेट घेतला. वेळीच मोबाईल फेकून दिला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सद्यस्थितीत शहरी भागासोबत खेडो पाडी मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. याच मोबाईल वरून अनेक ऑनलाईनची कामे केल्या जात असून मोबाईल हे मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन बनले आहे. मात्र सद्यस्थितीत मोबाईल फोनमध्ये स्फोट होण्याच्या, त्याला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील नावली इथं घडली.
रिसोड तालुक्यातील नावली येथील आकाश गणेश राऊत हे शेतकरी आपल्या शेतातून बैल गाडी घेऊन घरी परतत असताना गावानजीक आल्यावर अचानक त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या रेडमी (MI) मोबाईलचा त्यांना चटका लागला. त्यांनी त्वरित खिशातून मोबाईल बाहेर काढून पाहला तर त्या मोबाईलमधून धूर निघत असल्याचं दिसलं. लागलीच त्या मोबाईल ने पेट घेतल्यानं आकाश राऊत यांनी त्वरित तो मोबाईल तिथंच जमिनीवर फेकला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस जमादार दामोधर ईप्पर आणि रुपेश बाजड पाटील यांनी पेट घेतलेल्या मोबाईलवर पाणी टाकून विझविला. तोपर्यंत मोबाईल आतून पुर्णतः जळून गेला होता.
सुदैवाने आकाश राऊत यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टाळण्यात यश मिळाले. यामध्ये आकाश राऊत यांना कोणतीही जखम झाली नाही. परंतु, मोबाईलने पेट घेतल्याने मोबाईल पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी असलेल्या आकाश राऊत यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.