महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावे लागते याची राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी – प्रवीण दरेकर

बुलडाणा : ३० मे – “आपल्या आई-बहिणींना सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागत असेल, तर राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला. गेल्या आठवड्यात बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात बिल देण्यासाठी अकरा हजार रुपये कमी पडल्याने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवत पठाणी वसुली केल्याचा निषेधार्ह प्रकार उघडकीस आला होता.
बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी या घटनेवरुन प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले की “खासगी कोव्हिड रुग्णलयाचे बिल तपासण्यासाठी ऑडिटर नेमले आहेत, पण काय दिवे लावलेत? सरकार फक्त योजनांच्या घोषणाच करत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. आपल्या आई-बहिणींना सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागत असेल, तर राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी चीड व्यक्त केली.
संपूर्ण बिल भरण्यास 11 हजार रुपये कमी पडत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून घेतल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात समोर आली होती. जोपर्यंत 11 हजार रुपये देत नाही तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही, अशी तंबी देखील या रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर रुग्णाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र काढून रुग्णालय प्रशासनाला द्यावं लागलं.
संबंधित घटनेवर रुग्णाच्या मोठ्या भावाने नाराजी व्यक्त केली. उपचारासाठी भावाच्या पत्नीने कानातील दागिने गहाण ठेवले होते. खरं तर त्या दागिन्यांची किंमत 28 हजार रुपये इतकी होती. मात्र, वेळ वाईट असल्याने समोरच्याने फक्त 23 हजार दिले. रुग्णाला डिस्चार्ज मिळणार होता. रुग्णालय प्रशासनाने हिशोब केला. आमच्याकडे 11 हजार रुपये कमी पडत होते. तर रुग्णालय प्रशासनाने ते पैसे दिल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रच मागितलं. आमचा रुग्ण तिथे असल्याने आम्हाला नाईलाजाने मंगळसूत्र जमा करावं लागलं, अशा शब्दात रुग्णाच्या भावाने व्यथा मांडली.

Leave a Reply