यवतमाळ : ३० मे – पत्नीला मारहाण करण्याची धमकी देत मेहुणीवर अत्याचार केल्याची घटना यवतमाळमधील चांदोरेनगर परिसरात उघडकीस आली आहे. हे दुष्कृत्य करणारा आरोपी मोहा परिसरातील आश्रमशाळेचा शिक्षक आहे. या प्रकरणात पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संदीप लांडगे (४०) रा. चांदोरेनगर यवतमाळ असं आरोपीचं नाव आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ती जि. नांदेड येथील मूळ रहिवासी आहे. मात्र चार वर्षापासून ती येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी म्हणून ती चांदोरेनगर येथे आपल्या बहिणीकडे राहते. परंतु शिक्षक असलेले भाऊजी तिच्या बहिणीला नेहमी मारहाण करतात. मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवू दे, नाही तर तुझ्या बहिणीला मारतो, अशी धमकी देत असल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटलं आहे.
या धमकीला घाबरुन पीडिता गेल्या तीन वर्षांपासून आरोपीचा अत्याचार सहन करत आहे. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवानिशी मारण्याची धमकीही दिली जात होती. यातूनच पीडितासोबत नराधम शिक्षकाने शरीरसंबंध ठेवले आणि ती गर्भवती राहिली.
याबाबत तिने २६ मे रोजी आरोपीला माहिती देताच आरोपी संदीप लांडगे याने तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली व अत्याचार केला. अखेर पीडित तरुणीने आपल्या मोठ्या भावाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप लांडगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. अधिक तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कार करत आहे.
दरम्यान, सतत अत्याचार होत असल्याने पीडित साळी गावी निघून गेली होती. मात्र या शिक्षकाने धमक्या देऊन तिला परत आणले. त्यातच पीडितेच्या तक्रारीवरून २०१८ मध्येही शिक्षकाविरुद्ध कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र पत्नीवर दबाव आणून ही केस शिक्षकाने दडपल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.