वर्धा : ३० मे – कोरोनाने आतापर्यंत अनेक कुटुंबं उध्वस्त केली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात राहणाऱ्या शेंडे कुटुंबाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली. एकापाठोपाठ घरातील दोन कर्ते मुलं आणि आईनं जगाचा निरोप घेतला. त्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसलळा आहे. चार चिमुकल्यांसह केवळ दोन महिलांच्या खांद्यावर संसाराचं ओझं येऊन पडलं आहे. अशा संकटाच्या काळात किमान रुग्णालयानं या कुटुंबाला दिलासा दिला. कुटुंबावर एवढा मोठा आघात झाल्यानं, उपचारासाठी भरलेले पैसे परत करत रुग्णालय प्रशासनानं माणुसकी दाखवून दिली.
वर्धा येथील शेंडे कुटुंबासाठी गेला आठवडा जणू दुर्दैवाचा घेरा लागल्यासारखा ठरला. या कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि आईचा कोरोनानं अंत झाला. एकाच आठवड्यात होत्याचं नव्हतं झालं. वर्ध्याच्या सेलूमध्ये शेंडे कुटुंबीय राहत होते. आई, दोन विवाहित मुलं आणि त्यांचा भरलेला संसार. सर्वकाही व्यवस्थित असताना कोरोनाची नजर कुटुंबाला लागली. आधी कुटुंबातील मोठा मुलगा कैलास आणि आई उषा यांना कोरोनाची लागण झाली. या दोघांनाही नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतांनाच आधी मुलाचा आणि दोन दिवसांनी आईचा मृत्यू झाला. या दुःखातून सावरण्याआधीच धाकट्या भावालाही कोरोनाची लागण झाली आणि त्याचाही सावंगीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घरातील दोन कर्ते पुरुष आणि आई यांच्या निधनाने चार छोटी मुलं आणि दोघी जावांचा संसार उघड्यावर आलाय. मृ पावलेला मोठा मुलगा कैलास वर्ध्यातील खासगी बँकेत तर छोटा मुलगा कृषी उत्पन्न बाजार समितीत मापारी म्हणून काम करायचा. कैलास यांच्या मागे पत्नी, एक आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. तर विलास यांच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. या कुटुंबाचं काय होणार या विचारानंच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.