नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात पुन्हा एकदा तणाव

कोलकाता : २९ मे – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालला दाखल झाले होते. या बैठकीत ममता बॅनर्जी अर्ध्या तास उशिरानं दाखल झाल्या. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाट पाहावी लागल्याचं सांगत केंद्र सरकारकडून ममता बॅनर्जींचं वर्तन ‘असभ्य’ असल्याची टीका करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि मुख्य सचिव जाणूनबुजून ३० मिनिटं उशिरा आल्याचं, ‘केंद्राच्या सूत्रां’चं म्हणणं आहे. इतकंच नाही तर केंद्राकडून पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी दिल्लीत बदली करण्यात आली. यानंतर पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
‘३० मिनिटे वाट पाहावी लागली म्हणून एवढा गोंधळ… भारताचे नागरिक १५ लाखांसाठी गेल्या ७ वर्षांपासून वाट पाहत आहेत, एटीएमच्या रांगेत तासनतास उभे राहत आहेत, नाागरिक लशीसाठी कित्येक महिने वाट पाहत आहेत… कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहून बघा’ असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय.
चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिमी मेदिनीपूरच्या कलाईकोंडा जिल्ह्यात एक बैठक घेतली. या बैठकीला ममता बॅनर्जी अर्धा तास उशिरानं पोहचल्या. त्यानंतर २० हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अहवाल पंतप्रधानांना सोपवत आपल्याला इतर बैठकीला जायचं असल्याचं सांगत ममता बॅनर्जी बैठकीतून निघून गेल्या.
ममता बॅनर्जी यांच्या उशिरा बैठकीत दाखल होण्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासहीत अनेक नेत्यांनी टीका केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाईकोंडा पोहचण्यासाठी २० मिनिटांहून अधिक वेळ लागणार होता. त्यामुळे, ममता बॅनर्जी यांनाही २० मिनिटे उशिरानं येण्यासाठी कळवण्यात आलं होतं, असं स्पष्टीकरण ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय.

Leave a Reply