बारावी परीक्षेसंदर्भातील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : २८ मे – देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे, अशी मागणी करणारी याची सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि सीबीएससीला या याचिकेची एक प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट या कालावधीत होण्याची शक्यता आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक 1 जूननंतर जाहीर होणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची पद्धत बदलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ममता शर्मा यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या महामारीत बारावीची परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन घेणे शक्य नाही. या परीक्षेचा निकाल उशीरा जाहीर झाल्या परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होईल आणि त्यांच्या भवितव्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे परीक्षा रद्द करून मर्यादित वेळेत वस्तुनिष्ठ पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत शर्मा यांनी केंद्र सरकार, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांना पक्षकार करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा आणि त्यानंतर उशीरा लागणाऱ्या निकालामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षावर गंभीर परिणाम होण्याची भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply