नागपूर : २७ मे – कोरोनानंतर होणारे ब्लॅक फंगस इन्फेक्शन (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणार्या अँम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे उत्पादन वर्धेतून सुरू झाले असून, जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. क्षीरसागर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी या इंजेक्शनच्या वितरणाचा शुभारंभ केला. जिल्हाधिकार्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे.
अँम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा आणि त्याचा सुरू असलेला काळाबाजार पाहता नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शनही विदर्भात तयार व्हावे, यासाठी प्रयत्न केले. गेल्या 14 मे रोजी त्यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला अॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही मंजुरी मिळाली. येत्या 15 दिवसात या इंजेक्शनची निर्मिती वर्धा येथून होईल असे गडकरी त्यावेळी म्हणाले होते. ते शब्द आज खरे ठरले. वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज 20 हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे.
या इंजेक्शनचा सध्या तुटवडा आहे. जेनेटिक लाईफ सायन्सेस ही कंपनी हे इंजेक्शन 1200 रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. याप्रकरणी जेनेटिक लाईफचे संचालक डॉ. क्षीरसागर म्हणतात, गडकरींच्या सूचनेनुसार आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे या इंजेक्शनचा परवाना मिळाला व इंजेक्शन निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही त्यांनीच उपलब्ध करून दिला. आता हे इंजेक्शन तयार झाले आहे. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे फायदेकारक आहे. कच्चा माल उपलब्ध झाला तर या इंजेक्शनची निर्मितीही वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग असल्याचेही डॉ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.