भाजप आणि आरएसएस मराठा आरक्षणाचे खरे विरोधक – सचिन सावंत यांची टीका

मुंबई : २७ मे – मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘भाजप आणि आरएसएस मराठा आरक्षणाचे खरे विरोधक आहे. मराठा आरक्षणाचा विरोध करणारी सेव्ह मेरीट संस्था भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
बुधवारी कोल्हापुरात सेव्ह मेरीट संस्थेने मराठा आरक्षणाविरोधात आंदोलन केलं. ही संस्था भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे. भाजपच्या इशाऱ्याने या संस्थेची स्थापना झाली. भाजपने या संस्थेला रसद पुरवली, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
या संस्थेचे थेट नागपूर, आरएसएसशी कनेक्शन आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल लद्दड आहेत. त्यांच्या वेबसाईटवर 7 नावं आहेत, ही नावं आरएसएसशी संबंधित आहेत. डॉ. अनुप मरार, रॉय थॉमस, डॉ. अनिल लद्दड हे भाजपने बोलावलेल्या बैठकांना उपस्थित असतात, कार्यक्रमात उपस्थित असतात, असा आरोपही सावंत यांनी केला.
‘या संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेचा पत्ता डॉ. अनुप मरार यांच्या घरचा दिला आहे. डॉ. अनुप मरार भाजपच्या पूर्व विदर्भाचे डॉक्टर सेलचे संयोजक आहेत. ही मंडळी सेव्ह मेरीटचे संस्थापक आहेत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आहे, या सगळ्यांनी मराठा आरक्षण विरोधात मोर्चा काढला होता’, असंही सावंत म्हणाले.
‘सेव्ह मेरीट संस्थेच्या वेबसाईटचे काम ज्या कंपनीने केले त्या कंपनीला देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवाराची आणि अन्य कामं मिळाली होती. आता फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, भाजपचा हेतू यातून समोर आला आहे, असंही सावंत म्हणाले.
दरम्यान, बुधवारी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेचे सदस्य डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील हॉस्पिटलसमोर मराठा समाजाने आंदोलन केले होते. मराठा आरक्षणातून झालेली भरती रद्द करण्याची मागणी या संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे संतप्त मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केले होते. डॉ. तन्मय व्होरा यांनी मराठा तरुणांची माफी मागितली होती.

Leave a Reply