छत्रपती संभाजीराजेंवर निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई : २७ मे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजपमधील काही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपतींवर आरोप करायलाही सुरुवात केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनीही संभीजीराजे छत्रपतींवर जहरी टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला मराठा समाजाने ठेका दिलेला नाही, असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मात्र य भेटीवरून राजकीय चर्चांनाही सुरुवात झाली आहे. नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खास नीलेश राणे यांनीही या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब आणि महा विकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं, पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, अशा शब्दांत नीलेश राणेंनी संभाजीराजेंवर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये भेटी देत त्यांनी भावना जाणून घेतल्या. त्या अंतर्गतच त्यांनी गुरुवारी शरद पवारांचीही भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी पवारांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा सर्व नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
संभाजीराजे या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहेत. पण त्यांच्या शरद पवारांच्या भेटीमुळं आता भाजप नेमकी काय भूमिका घेतं हेही पाहावं लागणार आहे. काही नेत्यांनी तर या भेटीवर टीका करायला सुरुवातही केली आहे. त्यामुळं या मुद्दयाभोवती आणखी राजकारण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply