सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बज्जावार

बज्जावार पीडब्लुडी चा सिव्हिल कनिष्ठ अभियंता. उंचीने ठुसका ४’८”, बांध्याने आडवा बसका , रंग गव्हाळ गोरा, तोंडात पानाचा सदैव तोबरा, पण पांढ-या शुभ्र शर्ट वर पानांचा एक डाग नाही, नाक बसकं त्याच्यावर नेहमी सोनेरी फ्रेमचा आयताकृती सुबक चष्मा, उजवीकडचे डोक्यावरील टक्कल झाकण्यासाठी तेलाने चापुन चुपुन वळलेले केस, भरदार बांधा, त्यावर सदैव लेनिन चा , लांब बाह्यांचा कडक परीटघडीचा डार्क पॅंटमध्ये खोचलेला, पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅंटवर पट्टा. शर्टाच्या वरच्या खिशाला सोनेरी रंगाचे पार्कर पेन अडकलेले, मनगटात सोनेरी घड्याळ, एकंदरीत सोनेरी रंगाचा फॅन आमचा बज्जावार आणि पायात स्किन कलरच्या मोज्यांवर चकचकीत चकाकणारे लेसची फुली करून बांधलेले ब्राऊन रंगाचे बुट. उजव्या हातात ४-५ आॅफिसच्या फाईली आणि डाव्या हाताने पेन शी चाळा. आॅफिसमध्ये सदैव धावत चालणारा प्राणी म्हणजे “बज्जावार”.
ह्याला व्हीआयपी गेस्ट हाऊस चा चार्ज दिलेला. आॅफिस आणि व्हीआयपी गेस्ट हाऊस एकमेकांसमोर मध्ये फक्त डांबरी रस्ता. बरे! ह्याला दिलेले वेगळे आॅफिस गेस्ट हाऊस चे परिसरात. त्या आॅफिस चा हा एकुलता एक अनिभिषिक्त सम्राट.
संपूर्ण गेस्ट हाऊस ह्याचे मालकिचे हा सामान्य जनांना सांगणार, येणा-या पाहुण्या अभियंताला जागा आहे की नाही. आॅफिशीयल व्हिजीट करायची असेल वगैरे अगदी टशन मध्ये हो किंवा नाही , नाहीतर जा उडत आविर्भावात उडवून लावणार. मनानी हा दिलदार, कुणाला दुखवायचा ह्याचा पिंड नाही पण हा मात्र सदैव पिडलेला. बरे! वृत्तीने बज्जावार मिश्किल, सगळ्या परिस्थितीत मिश्किल कोट्या करीत … हर फिकर को धुवे मे उडा sssssss…….
व्हीआयपी गेस्ट हाऊस ला तसे बघितले तर खुप महत्व. नागपूर पासून ७७ कि.मी. त्यामुळे कोणी यवतमाळ, पुणे रस्त्याने जाणार येणार असेल तर राजनयिक मंडळी, पीडब्लुडी चे मोठे पदाधिकारी, आणि इतर ओळखी पाळखी चे सगळ्यांचे पिलांटु – चहा पेक्षा किटल्या गरम – इथे चहा पाण्यासाठी थांबणार, चहा नाश्ता घेणार आणि पुढे निघणार….. अरे हो पण खाल्ले- पिल्ले खर्च कोण देणार??????
इथले त्यावेळचे आमदार आमोद भेंडे ह्यांचा मोठा दबदबा. बज्जावार च्या भाषेत हा माणूस गावात असला की घरी नाही तर २४ तास व्हीआयपी गेस्ट हाऊस मध्ये ठिय्या मांडून बसला असतो.
अधिवेशन नागपुरात आणि राहणा-यांचे लोड मात्र व्हीआयपी गेस्ट हाऊस वर. कोण कोण राहतं, तर….. हा विषय पुढे घेऊ.
तर असा सरळसोट वृत्तीचा निर्भीड काळजाचा अभियंता बज्जावार ला आमदार भेंडे चा फोन आला की बसल्या जागी उसळून उभा…फोन संपल्यावर खुर्चीत बसायचा. म्हटलं बज्जावार!!!!!!! यार काय झालं असे की तू एकदम खुर्चीत उभा…. तेही एका फोनसाठी???????
बज्जावार सांगू लागला अबे यार आपल्या सगळ्या किल्ल्या ह्या राजनैतिक आमदारांच्या हातात असतात. हा बुवा रात्री अपरात्री केव्हाही फोन करतो, आॅफिशीयल किंवा अनआॅफिशीयल मला त्यांच्या माणसांची सोय करुनच् द्यावी लागते. नाही केली तर हे लोकं आमचा सर्वांसमक्ष पाणउतारा करतात. त्याला ही आणि मलासुद्धा माहिती आहे की मी त्याचे बिघडवू शकत नाही. असे म्हणून त्याने पिकदाणीत आमदाराच्या नावाने, पानाचा तोबरा भरल्या तोंडाने एक जोरदार पिंक मारली.
आज त्याने तासाभरात वर्ध्यातील कलेक्टर, पोलिस डीवायएसपी आणि तत्सम एकुण १५ लोकांसाठी दिवसभराची मिटींग सकाळी १० ते ५.३० सायंकाळपर्यंत ठेवली आहे. त्यांना तीन वेळा चहा स्नॅक्स, एक लंच…. यार एका तासात कसे अरेंज करणारं?????? ……. असे म्हणून त्याने अस्सल ठेवणीतल्या चार व-हाडी शिव्या आमदाराला घातल्या, अजून एक पिंक आमदा-याच्या नावाने पिंकदाणीत मारली आणि पुढच्या कामाला लागला.
माझे स्वतः चे व्हीआयपी गेस्ट हाऊस चे वरील बांधकाम सुरू असल्याने जवळपास सगळे आॅफिस आपले दोस्त मित्र झालेले. मी माझ्या कामाने निघून गेलो आणि जवळपास चार वाजता परत आलो तर सगळे १५ टॉप रॅंकिंग आॅफिसर्स बाहेर लॉबी मध्ये चकल्लस करीत होते. मला वाटले चहापानासाठी हे लोकं बाहेर आले असतील. मला बघताच बज्जावार ने हात दाखवला, बोलला ये आपण ही चहा कॉफी स्नॅक्स घेउ बरोबर. कॉफी घेता घेता बज्जावार परत बफरला…..साला आमदार…. सकाळपासून हे पंधरा आॅफिसर्स इथे आले आहेत आणि आमदार चा पीए दर तासाला सांगतोय, बस १५ मिनिटांत पोचतोय म्हणून. मला तो “साहेबा” म्हणायचा. म्हणाला साहेबा कर बरं रे गणित १५ आॅफिसर्स चे आठ तास म्हणजे ह्या माणसानी ९० तास टॉप लेव्हलचे वाया घालवले, ह्याची भरपाई कोण करणार???? म्हटले बज्जावार – बात मे तो दम है…
अरे आज आता हा मिटींग पोस्ट पोन करेल आणि आज झालेला खर्च पण नाही देणार… आत्ता इतके दिवसांनंतर बज्जावार ने मुद्द्याला हात घातला…. म्हटले म्हणजे….. अरे हा भोxxx…..मा xxxx इथे राहतो, झोपतो, मिटींगा घेतो, सगळ्यांची बिलं घेतो पण पैसा एक ही देत नाही. इथे येणारे बहुतेक आमदार बाप का माल …. करो हलाल…… गेस्ट हाऊस ला एक रुपया देत नाही….. आम्ही यार कसं चालवायचं……यार नाही रुपया…… देत… नाही नाही देत…….पण गेस्ट हाऊस च्या चादरी, चांगले कप कधी कधी तर चहाच्या किटल्यासुद्धा घेवून जातात. यार एका पगारात एक घर चालत नाही आणि इथे तर आमची लुट चालली आहे. बज्जावार रागाने थरथर कापत होता….पण असहाय आहे हे त्याचा चेहरा दाखवत होता. पिडित बज्जावार चिंताग्रस्त…. मला ही गुगली एकदम नवीन, कधी ह्या विषयावर विचार करायची गरजंच् नव्हती. अरे मग खर्च कसे चालवतो??????? त्याने आवर्जून सांगितले की नितीन गडकरी असा माणूस आहे जो निघायच्या आधी मला बोलावतो, हिशोबाचे पैसे मला मिळाल्याची खातरजमा करतो, मला दोन बोल कौतुकाचे बोलतो आणि मग गेस्ट हाऊस सोडतो. पण बाकी पक्षाचे….. परत शिव्यांची लाखोली…
म्हटले मग आज तू काय करणार तो म्हणाला जाईन कार्यकारी अभियंता धनाढ्य साहेबांकडे करेल काही तरी व्यवस्था. …… मी चिंताग्रस्त…. ऐसा भी होता है?????????
आम्ही निवडुन दिलेला आमदार, आमची सेवा करायची सोडुन आमच्यावर अरेरावी करणार आणि ज्यांच्यावर शेकणार ते भोगत राहणार….. कायद्यात कुठे काय कमी आहे कोण शोधणार? चार दिवसांनी मी पण विसरणार… कारण बज्जावार निस्तरत बसेल त्याची पिडा……
साल्यांची नियत खराब अशा आमदारांची आणि त्यांच्या नातेवाईकांची, साले पैशाची कमी नाही घरी पण गेस्ट हाऊस च्या चादरी चोरून नेतील…….साली इनके नियत मे खोट….क्या करे हम ही देते है कॉंग्रेस को गलत व्होट…
दुस-या दिवशी बज्जावार च्या आॅफिसला गेलो, बज्जावार एकदम खुशीत, म्हटले बज्जावार साहेब, कालचा इश्यू सलटला????
बज्जावार खुशीत सांगु लागला… “धनाढ्य” साहेबांनी मला सांगितले आहे की ह्या फालतू गोष्टींसाठी रडायचे नाहीस. किती खर्च झाला ते नीट लिहून ठेवायचे. आॅफिसची डागडुजी, कंपाऊंड रिपेअर, स्लॅब लिकेजेस रिपेअर, ड्रेन पाईप बदलणे असे किरकोळ काम माझ्या स्कोपमध्ये येतात. त्याचे कोटेशन घेऊन कामं अलॉट केले असे दाखवायचे आणि हे पैसे आॅफिशीयली सॅंक्शन करून घ्यायचे……येवू दे आता कितीही लोकांना गेस्ट हाऊस मध्ये……..

आपण कुठल्या दिशेला चाललो आहे??????
मला कळेनासे झाले आहे?????
तुम्हाला सुचतोय मार्ग??????
सांगु शकता तोडगा?????
मी सामान्य माणूस माहिती असुन सुद्धा मी असहाय आणि सरकारी यंत्रणेच्या अधीन… ज्या यंत्रणेने अजून एका बज्जावार ला भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त केले…… आता हा काय फक्त झालेला अनाठायी खर्च काढणार की भ्रष्टाचार ह्याच्या रक्तात भिनणार????? हे काळ ठरवेल मात्र सामान्य माणसाच्या घामाने कमावलेल्या पैशाचा अपव्यय करण्याचा, मालकी हक्क ह्या सरकारी यंत्रणेला कोणी दिला!!!!!!
हा प्रश्न मात्र अनुत्तरितच….

भाई देवघरे

Leave a Reply