रामदेवबाबांचे डॉक्टरांबाबत आणखी एक विधान, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : २५ मे – अँलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी डॉक्टरांसंदर्भात वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बाबा रामदेव यांच्या एका योग अभ्यास वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये रामदेव योगा करता करता योगसाधना करणाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र बोलता बोलता त्यांनी करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
एक हजार डॉक्टर करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतरही मेले आहेत, असं बाबा रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसतात. जे लोक स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते कसले डॉक्टर?, असा प्रश्नही बाबा रामदेव यांनी उपस्थित केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच रामदेव हे डॉक्टरांवर उपहासात्मक वक्तव्य करताना दिसतात. “तिसरा म्हणाला मला डॉक्टर व्हायचं आहे. टर…टर…टर…टर…टर…टर… डॉक्टर बनायचं आहे. एक हजार डॉक्टर तर आता करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर मरण पावले. किती डॉक्टर? एक हजार… कालची बातमी आहे. स्वत:लाच वाचवू शकत नाहीत हे कसले डॉक्टर”, असं रामदेव यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना, “डॉक्टर बनायचं असलं तर स्वामी रामदेवसारखं बना. ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाहीय तरी ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवी शिवाय, दैवत्वाशिवाय मात्र प्रतिष्ठेसहीत मी एक डॉक्टर आहे,” असं रामदेव म्हणतात दिसतात. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नायक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. नायक यांनी रामदेव यांचा उल्लेख ढोंगी असा केलाय. “जर तुम्ही अशा खोट्या, निर्लज्जपणे आणि संवेदनशून्य पद्धती बोलणाऱ्याविरोधात आहात तर मोदी सरकारला ओरडून सांगा की बाबा रामदेव यांना अटक करा,” असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply