पोलीस पटलावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी गावकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : २५ मे – शेतात सभागृह बांधू दिले नाही म्हणून सोनुनाच्या पोलिस पाटलांच्या कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या कुटुंबाला किराणा, दळण आणि पाणी देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. चान्नी पोलिसांत दाखल तक्रावरीवरून गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अकोला जिल्ह्यातच घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणाऱ्या महिलेस थुंकी चाटण्याची शिक्षा जात पंचायतीने दिली होती.
पातूर तालुक्याच्या टोकावर जंगल भागात पांढुर्णा आणि सोनुना ही दोन गावे वसली आहेत. या दोन गावांची गटग्रामपंचायत आहे. साडेसहाशे लोकसंख्येच्या सोनुना गावात मागील ३५ वर्षांपासून रमेश नारायण कदम हे पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत. कदम यांच्या शेतात गावातील काही पुढाऱ्यांनी सभागृह बांधण्याचा प्रयत्न केला. याला आक्षेप घेत बांधकाम करण्यापूर्वी आपली परवानगी का घेतली नाही, असे त्यांनी विचारले. पण, कदम यांच्या कुटुंबाला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली. एवढ्यावरच न थांबता २७ एप्रिलपासून कदम यांची पत्नी शशिकला, आई गंगुबाई, मुलगी गोकुळा, रिना आणि मुलगा प्रमोद कदम या सर्वांवर बैठक घेऊन बहिष्कार टाकण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या कुटुंबाशी गावातील कुणी बोलल्यास त्याला दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून या कुटुंबाशी कुणीही बोलले नाही.
अस्वस्थ झालेल्या कदम यांनी २० मे रोजी चान्नी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपली वादाचे कारण पुढे करून पोलिसांनी दुर्लक्ष केले. बहिष्कार टाकल्यानंतर दुसरी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांचे दुर्लक्षित धोरण कायम असल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली. यानंतर चान्नी पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ सहकलम ५ सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत प्रतिबंधक अधिनियम २०१६नुसार सोनुना गावातील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद भुईकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश नावकार करीत आहेत.
पोलिस प्रशासनाचा गावपातळीवरील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. सुरुवातीला त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यावरून सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर पोलिसांनी पवन चोंडकर, देवानंद चोंडकर, भारत गिऱ्हे, अमोल हांडे, माणिक कदम, दिनकर कदम, धोंडू गिऱ्हे, दिगांबर चोंडकर, गजानन डाखोरे, सुधाकर गिऱ्हे, संजय चोंडकर, अंकुश चोंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘२७ एप्रिलपासून गावकऱ्यांनी आमच्याशी संबंध तोडले. बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे गावातील कुणी नमस्कार केला तरी दंड आकारण्यात येते. किराणा, पाणी, दळण सारेकाही बंद करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि ठाणेदारांनी धीर दिल्याने आम्ही निवांत झालो’, असे पोलिस पाटील रमेश कदम यांनी सांगितले.

Leave a Reply