नवी दिल्ली : २५ मे – कुस्तीपटू सागर राणा हत्याकांडप्रकरणी भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्यासमोर अजून एक मोठे संकट उभे राहिले आहे. सुशीलला उत्तर रेल्वेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी उत्तर रेल्वेच्या सीपीआरओने ही माहिती दिली आहे.
अटकेनंतर सुशील कुमारच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता होतीच. दिल्ली सरकारने सुशीलची डेप्युटेशन वाढविण्याची मागणी फेटाळली. दिल्ली सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला असून तो कार्यरत असलेल्या उत्तर रेल्वे विभागात पाठविला होता. २०१५पासून सुशील दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता आणि त्याचा कार्यकाळ २०२०पर्यंत वाढविण्यात आला होता. यावर्षीही हा कार्यकाळ वाढवायचा होता. उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमारला दिल्ली सरकारने छत्रसाल स्टेडियमवर ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त केले होते.
छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता.
पीडित सागर राणाच्या कुटुंबाने याप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी केली असून सुशील कुमारला कठोर शिक्षा केली जावी अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखींच्या माध्यमातून तपासावर प्रभाव पाडू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे. सागर राणाच्या आईनेही संताप व्यक्त केला असून गुरु म्हणण्याची त्याची पात्रता नसल्याचे म्हटले आहे.