रामदेवबाबांचा माफीनामा सादर- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली पाठराखण

नवी दिल्ली : २४ मे – ‘अँलोपॅथी उपचारपद्धती हा मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी’ असल्याचं म्हणणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांनी आता आपला माफीनामा सादर केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या पत्रानंतर रामदेव यांनी ‘वक्तव्य मागे घेत असल्याचं’ ट्विटरवर जाहीर केलंय. यानंतर, ‘आपलं वक्तव्य माघारी घेत रामदेव यांनी आपल्या परिपक्वतेचं उदाहरण दिल्याचं’ सांगत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एकप्रकारे रामदेव यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं एकप्रकारे सूतोवाचच केलंय.
योगगुरु म्हणून लावलौकीक मिळवणाऱ्या रामदेव यांचा ‘अँलोपॅथीमुळे अनेकांचा मृत्यू’ झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून आक्षेप व्यक्त करण्यात आला होता. ‘जनतेसमोर खोटे दावे करणाऱ्या आणि भ्रम निर्माण करणाऱ्या रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. रामदेव यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर असोसिएशनला संघर्षावर उतरण्याची वेळ येईल आणि यासाठी न्यायालयाचीही मदत घेतली जाईल. स्वत: मॉडर्न मेडिसीन अँलोपॅथीचा उपचार घेणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी एक तर रामदेव यांचे आरोप मान्य करत अँलोपॅथी उपचारच अमान्य करत रोखावेत नाही तर धाडस दाखवत रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा’ असं आव्हानंच ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दिलं होतं.
यानंतर, अँलोपॅथीसंबंधात केलेलं वक्तव्य रामदेव बाबांनी मागे घ्यावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. यासाठी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राला उत्तर देताना ‘माननीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी तुमचं पत्र मिळालं. उपचारपद्धतीवर निर्माण झालेल्या वादाला खेदपूर्वक विराम देत मी माझं वक्तव्य परत घेतो’ असं म्हणत रामदेव यांनी खेद व्यक्त करत एक पत्रही आरोग्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलं. ‘आम्ही आधुनिक उपचारपद्धती आणि अँलोपॅथी विरोधात नाहीत. मात्र, माझ्या वक्तव्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो’ असं रामदेव यांनी म्हटलंय.
यानंतर आरोग्यमंत्र्यांनीही तत्काळ बाबा रामदेव यांचा माफीनामा स्वीकारल्याचं जाहीर करून टाकलंय. ‘बाबा रामदेव यांनी अँलोपॅथीक उपचारपद्धतीवर केलेलं आपलं वक्तव्य मागे घेत प्रकरणाला विराम दिला आहे. हे स्वागतयोग्य आणि त्यांच्या परिपक्ततेचं उदाहरण आहे. भारतानं कोविड १९ चा सामना अत्यंत दृढनिश्चयानं केला हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. आपला विजय निश्चित आहे’ असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. अशाप्रकारे, योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार नाही, हे आरोग्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे सूचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply