लखनऊ : २३ मे – अयोध्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तीन चिमुरड्यांचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुतण्यानेच काकाच्या कुटुंबाला संपवल्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री इनायत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रमेश या आपल्या काकांसोबत पुतण्या पवनचा गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. संपत्तीच्या कारणावरुन त्यांच्यात वारंवार तंटे होत होते. हा पुतण्या आपल्या काकाच्याच घरात राहत होता.
शनिवारी रात्री उशीरा पवनने त्याचे काका रमेश, काकी ज्योती आणि आपल्या तीन चुलत भावंडांची गळा चिरुन हत्या केली. भावंडांमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका मुलीचा समावेश होता. यानंतर पवन फरार झाला. त्याला पळून जाताना पाहून काही गावकरी त्याच्या घरी गेले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांनी पोलिसांना बोलावले.
अयोध्येचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश पांडे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासामध्ये संपत्तीच्या वादातून पवनने या हत्या केल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्व मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पवनचा शोध घेण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक नेमण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले.