सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बाप्तिस्मा – १

साधारण १९८०-८१ वडिलांचा कामाचे संदर्भात ख्रिश्चन मिशनरीज चा संपर्क आला आणि मला त्यावेळी ह्या ख्रिश्चन मिशनरीज बद्दल प्रचंड आदर वाटायला लागला.
एक दोन वेळा त्यांचे आॅफिसला जायचा योग आला आणि अजुनच् प्रभावीत झालो. त्यांचे कार्यालय म्हणजे स्वच्छ चकचकीत, सर्व स्टाफ तुमच्याशी मृदू भाषेत बोलतोय, गेल्या गेल्या पाण्याचा ग्लास – काहीही संभाषण सुरू व्हायच्या आधी, विचारणार चहा की कॉफी? आयला आमचे भारतीय आॅफिसेस आणि ख्रिश्चन मिशनरीज चे आॅफिसेस सगळंच तूलनेच्या पलिकडले. भारावून गेलो होतो ह्यांच्या वागण्याने.
घाबरू नका माझ्याबद्दल, तुम्हाला आत्ता वाटतोय तसा विचार आणि विकार दोन्हीही माझ्या मनात नाही आला. आपण हिंदुत्ववादी तत्वाचे कट्टर संघवाले.
पण मनात सल होता की आपले लोकं आॅफिस मध्ये असे वागुच् शकत नाही आणि असे आदरातिथ्य तर नाही च् नाही. त्यामुळे ख्रिश्चन लोकांबद्दल एक आदर निर्माण झाला मनात. मी असेन त्यावेळी दहावी ला.
२५ डिसेंबर १९८१, वेळ संध्याकाळची – ख्रिश्चन मिशनरीज चे लोकं सिस्टर डॅनियल, सिस्टर फ्रान्सिस (हिचे नाव आठवत नाहीये पण कालांतराने तिची रवानगी फ्रांसला झाली म्हणून तिला सिस्टर फ्रान्सिस म्हणुया) त्यांचा पाद्री, आणि पाच लोकांचा लवाझमा आमच्या घरी अवतीर्ण झाला. रविन्द्र नगरचे आमचे छोटेखानी घर त्यावेळेस चे.
आमचे घर, घरांच्या रांगेत, घरासमोर छोटा डांबरी रस्ता आणि घरासमोर खेळाचे ओव्हल शेप पटांगण आणि ह्या पटांगणात सदैव आमचा राबता. आज मात्र मी घरी होतो आणि मित्र मंडळी पटांगणात क्रिकेट मध्ये व्यस्त.
अशा वेळी एकाचवेळी इतके लोकं आले ख्रिश्चन मिशनरीज चे म्हणून मी पटापट बाहेर अंगणात खुर्च्या वगैरे नेऊन, सगळ्यांची बसण्याची व्यवस्था केली. सगळ्यांचे थोडासा स्नॅक्स, चहा-कॉफी पान झाले, इकडल्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्यांच्या ह्या मृदू वागण्याने भारावलेला मी….
आमचे सगळे हे सोपस्कार आटोपल्यानंतर एकाने त्यांच्या गाडीतून चांगली पंचवीस किलो ची ख्रिसमस केक आणली.. आम्ही सगळ्यांनी मिळून मग आंगणातच् ती केक कापली…
इकडे पटांगणातील क्रिकेट थांबलेले, कुतुहलापोटी सगळा मित्रवर्ग आमच्या घरात काय चाललंय ह्याचा कानोसा घेत खेळातून विश्रामलेले.
हा आमचे अंगणात असा कार्यक्रम पार पडला, सगळ्यांनी ख्रिसमस केक खाल्ली, पटांगणातील मित्रांनापण आवडली आणि माझा ख्रिश्चन लोकाबद्दल आदर आणखी दुणावला.
२५ डिसेंबर चा हा उपक्रम जवळपास दहा वर्षे सुरू होता. अगदी अविरत न चुकता. मग सिस्टर फ्रान्सिस फ्रांस ला गेली आणि मग हा पायंडा खंडित झाला.
१९९८ कामानिमित्त मी रामटेक हुन मनसर ला आलो, नागपूर साठी निघालो होतो. डाव्या हाताला एक ख्रिश्चन मिशनरी आहे. त्या मिशनरी समोर , मंद पावसात छत्री घेऊन एक सिस्टर मला लिफ्ट साठी हात दाखवित होती. ज्या पद्धतीने हात दाखवत होती, जसे काही तिच्या ओळखीची ही कार आहे. उभी राहण्याची लकब बघितली म्हटले अरेच्चा !!!? सिस्टर डॅनियल…….
मी गाडी थांबवली, सिस्टर डॅनियल ला लिफ्ट दिली, तिला पण नागपूरला जायचे होते. आमच्या ब-याच जुन्या गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात तिने सांगितले ती सध्या मनसरला कार्यरत आहे. आणि पुर्ण ही मिशनरी ती सांभाळत आहे. तीने मला कॉफी साठी अगत्याचे निमंत्रण सुद्धा दिले आणि अगदी कुठलीही मदत लागली, मनसर- रामटेक ला तर निःसंकोचपणे भेट असे सांगितले. मी तिला तिच्या नागपूर आॅफिस ला सोडले आणि जुन्या आठवणींची उजळणी झाली.
पीडब्लुडी रामटेक ला २-३ कामं होती त्यामुळे आठवड्यातून ३-४ दा तरी जाणे होते.
एक दिवस दुपार ची वेळ ३-३.३० ची रामटेक हुन परतताना, प्रचंड जोरात पाऊस सुरू झाला अगदी समोरचे दिसेनासे होते, म्हणून म्हटले रिस्क घेण्यापेक्षा सिस्टर डॅनियल च्या मनसर मिशनरीत थांबावे, एखाद कप कॉफी प्यावी तोपर्यंत पाऊस पण कमी होईल.
सिस्टर डॅनियल च्या मिशनरीत गेलो. मी आल्याची वर्दी दिली, निरोप आला सिस्टर डॅनियल आराम करताहेत, पाच मिनिटाने येतील.
मी उभ्या असलेल्या त्या हॉलमध्ये प्रचंड रुग्णांची गर्दी होती. त्यांची सुश्रुषा सुरू होती, मला खरेच् गहिवरून आले किती पैसा खर्च करतात हे ख्रिश्चन लोकं हिंदू बांधवांवर…. थोडेसे आणिक जवळ जाऊन बघितले तर तिथे आमच्या गोरगरीब हिंदू बांधवांना उपदेशपर डोस सुश्रुषेबरोबर पाजले जात होते. ते असे…. हिंदू देवी देवतांना तुम्हाला सांभाळता आले नाही म्हणून तुम्हाला त्या देवतांनी येशू कडे पाठवले आहे. येशू तुम्हाला ठीक करेल, तुम्हाला पैसा देईल, तुमची सुश्रुषा करेल, तुमची काळजी घेईल, एकदा तुम्हाला फक्त “बाप्तिस्मा” करून आमच्याकडे यावे लागेल……..
अरे म्हटले ही मिशनरी म्हणजे धर्मांतरण केंद्र. हे लाघवी बोलणे म्हणजे मीठी छुरी, गोड गोड बोलून, दोन पैसे देवून – धर्माने बाटवून अधर्मी कृत्य करण्याची जागा म्हणजे मिशनरी.
ह्यांचे वागणे, बोलणे, अगत्य सगळे सगळे डोळ्यासमोर आले. सगळा आदर-अनादर मध्ये पालटला. घृणा वाटली ह्यांच्या अगत्याची.
माझ्या डोक्यात खळबळ माजवून, पाऊस निवांत झालेला. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला म्हंटले नको असली मैत्री, नको असले लोकं आपल्याबरोबर.
मी सिस्टर डॅनियल ला न भेटता, बाहेर पडलो बाहेर लख्ख उन पडलेलं आणि मिशनरी चे वातावरण धर्मांतरण वृत्तीने बरबटलेलं.
चुकी कोणाची? हिंदू गरीबांची, हिंदू वर्गाची जे ह्या लोकांबद्दल विचार सुद्धा नाही करत, की परिस्थिती चा फायदा घेवून धर्मांतरण करणा-या मिशन-यांची? आम्ही हिंदू लोकं सुद्धा असे इंटिरिअर मध्ये जाऊन मिशन-यांसारखे काम करणे, गरजेचे आहे, असे माझे वैयक्तिक मत.
डोक्यात काहुर माजलेल्या अवस्थेत किल्ली ने कार उघडली आणि पुढल्या मार्गाला लागलो.

भाई देवघरे

Leave a Reply