रक्तरंजित संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये शांततेची घोषणा

गाझा सिटी : २१ मे – तब्बल 11 दिवसाच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास आणि इस्रायलमध्ये शांततेची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझापट्टीतील सैन्य अभियानाला रोखण्याच्या एकतर्फी संघर्ष विरामाला मंजुरी दिली आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर हा आपला विजय असल्याचं सांगत हमासमध्ये प्रचंड जल्लोष केला जात आहे. तर दुसरीकडे हमास-इस्रायल यांचा हा संघर्ष विराम अधिक काळ टिकणार का? असा सवाल केला जात आहे.
11 दिवसानंतर इस्रायलने संघर्ष विराम जारी केला आहे. तसं निवेदनच इस्रायलने काढलं आहे. ‘सुरक्षा संबंधित कॅबिनेटची बैठक झाली. त्यात सर्व सुरक्षा दलाचे प्रमुख उपस्थित होते. त्यात इजिप्तच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यात हमासच्या सोबत संघर्ष विराम करण्याची ऑफर देण्यात आली होती. संघर्ष विरामासाठी कोणतीही अट ठेवण्यात आली नव्हती. त्यावर दोन्ही पक्षाने सहमती दाखवली असून आम्ही संघर्ष विराम जाहीर करत आहोत,’ असं इस्रायलने म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी या संघर्षविरामाचं स्वागत केलं आहे. अकरा दिवसापासून सुरू असलेला संघर्ष थांबला याचा आनंद आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी इजिप्त आणि कतारने दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे, असं गुतेरेस यांनी सांगितलं. तसेच या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही देशातील नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदनाही व्यक्त केली आहे.

Leave a Reply