भंडारा : २१ मे – भंडारा वन विभागातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत चिचोली परिसरात बछड्यासह वाघीण आढळून आल्याने वन्यप्रेमी, वन अभ्यासक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. व्याघ्रदर्शनासाठी ताडोबासह अन्य ठिकाणी जावे लागत असतांना भंडारा वन विभागातील व्याघ्र दर्शन वन्यप्रेमींना सुखावणारे आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या 2 बछड्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर ही वार्ता नक्कीच सुखावणारी आहे. सदर वाघीणीचे दर्शन वन विभागाव्दारे लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आले. त्यानंतर उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांच्या सुचनेने परिसरातील गस्त वाढविण्यात आलेली आहे. गस्तीसाठी नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आलेले आहेत. सदर पथक परिसराची गस्त दिवसरात्र 24 तास करीत असतात व वाघीणीच्या हालचालींवर सतत लक्ष देऊन असतात.
त्याचप्रमाणे वन विभागातील क्षेत्रिय कर्मचारी शेजारील गावांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणवर जनजागृती अभियान राबवित आहे. त्यामध्ये स्थानिक लोकांना सायंकाळ नंतर जंगलाच्या दिशेने एकटे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपले पाळीव प्राण्यांना जंगलात मुक्त चराईस जाण्यापासून थांबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गुराक्यांनी सदर परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. व त्यांना वाघीणी बाबत सजग करण्यात येत आहे.
स्थानिक विहिरींना सुध्दा जाळी लावून बंद करण्यात आले आहे. वाघीणीबाबत गावकऱ्यांना व लोकप्रतिनिधींना सुध्दा सुचना करण्यात आली आहे. सदर वाघीणीवर सनियंत्रण उपवनसंरक्षक भंडारा एस. बी. भलावी यांचे मार्गदर्शनात प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव आगार साकेत एन. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, वनपाल सुनिल दिघारे, वनरक्षक लक्ष्मीकांत बोरकर व इतर क्षेत्रीय कर्मचारी तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समिती हिरापूर (ह) व सरपंच चिखला वन्यप्राणी व्यवस्थापणामध्ये योगदान करीत आहे.