अमरावती : २१ मे – प्रेमात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक भयंकर प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. इथे अल्पवयीन प्रेमी युगुलाची एकाच झाडाच्या फांदीला वेगवेगळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १६ वर्षीय मुलगी तर १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मुलगी ही फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतून तर मुलगा राजापेठ ठाणे हद्दीतून मिसिंग झाल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी १४ मे रोजी नोंदविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्रेमीयुगुलांनी गळफास चार ते पाच दिवसांपूर्वी घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, सदर आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून यामध्ये कुटुंबाचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.