आंतरराष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनाने निधन

नाशिक : २० मे – क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांचे वडिल मनोहर गोऱ्हे यांचेही कोरोनामुळे निधन झाले. मोनाली यांच्या निधनामुळे नवोदित खेळाडूंची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
नेमबाजीमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंना मोनाली गोऱ्हे यांनी नेमबाजीचे धडे दिले आहेत. त्यामुळे नाशिकचे अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू शकले. विशेष म्हणजे मोनाली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेतल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे.
क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ दिवंगत भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. स्वतः खेळताना मोनाली यांना नेमबाज खेळाडूसाठी प्रशिक्षकांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे वैयक्तिक खेळाकडे दुर्लक्ष करून नेमबाजांची फौज उभी करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी एक्सएल टार्गेट शुटर्स असोसिएशनची स्थापना केली. यातून नाशिकच्या मातीमधून नेमबाजीतले अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडविले.
नेमबाजांच्या अचूक वेधामुळे मोनाली यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा बहुमान मिळाला. मोनाली यांच्या नेतृत्वखाली भारतीय संघाने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याआधी विश्वचषक स्पर्धेतही मोनाली यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. श्रीलंकेच्या नेमबाजानांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही श्रीलंकेच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली.

Leave a Reply