नागपूर : २० मे – हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मोंढा परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. आकाश पुरुषोत्तम उरिया (२६) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह आरोपी रहात असलेल्या शेजारच्याच एकाच बिल्डिंग मध्ये राहतात. आरोपीने एक वर्षापूर्वीच प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर त्याचे पत्नीशी पटत नसल्याने ती वेगळी राहत आहे. त्यानंतर आरोपी आकाशने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला त्याच्या घरी बोलावून १५ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान अनेक वेळा बलात्कार केला. सुमारे एक महिना लोटल्यानंतर त्या मुलीच्या पोटात दुखणे वाढल्याने तिच्या आईने विचारणा केली असता, मुलीने तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई वडिलांनी हिंगणा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरूद्ध तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे हिंगणा पोलिसांनी आरोपी आकाश उरियाला अटक केली आहे.