गडचिरोली : १९ मे – गडचिरोली येथे वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. रानभाज्या तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दिभना येथील महिलेवर वाघाने हल्ला केला असून या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वंदना अरविंद जेंगठे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.
गेल्या आठ दिवसांतील ही तिसरी घटना असून वंदना जेंगठे या काही महिलांसोबत रानभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुड्याची फुले तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तिथे वाघाने अचानक हल्ला केल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या वंदना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दिभना परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. यापूर्वी सुद्धा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मंगळवारची घटना वनविकास महामंडळ पोर्ला वनपरिक्षेत्रातील हद्दीत घडली. १० मे रोजी वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील गोगाव-महादवाळी जंगलात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या कल्पना दिलीप चुधरी (रा. महादवाडी) व सिंधू दिवाकर मुनघाटे (रा.कुऱ्हाडी) या दोन महिलांवर वाघाने हल्ला केला होता. त्या हल्ल्यात दोन्ही महिलांना जीव गमवावा लागला होता. १० मे रोजी घडलेल्या घटनेनंतर त्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आताची घटना वनविकास महामंडळाच्या हद्दीत घडली असली तरी, वनविभाग आणि वनविकास महामंडळाची हद्द लागूनच असून दोन्ही घटना जवळपास ४ ते ५ किलोमीटर अंतरात घडल्या आहेत.