नागपूर : १९ मे – जिवंतपणी गरिबांना लुटणारे निर्दयी हृदयाचे निर्दयी गुन्हेगार आपण नेहमीच बघतो. पण, मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारेही काही कमी नाहीत. त्याचाच एक संतापजनक प्रत्यय मेयो रुग्णालय परिसरात आला. या रुग्णालयात मृत पावलेल्या करोनाग्रस्तांचे साहित्य चोरून विकणाऱ्यांना तहसील पोलिसांनी जेरबंद केले.
गणेश उत्तम डेकाटे (२४) रा. वांजरा लेआऊट, पार्वतीनगर, कळमना व छत्रपाल किशोर सोनकुसरे (२५) रा. जुनी मंगळवारी, लकडगंज अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहे. दोघेही स्पीक अॅण्ड स्पॅन कंपनीचे कर्मचारी आहेत. या कंपनीला करोनाबाधितांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गणेश व छत्रपाल या दोघांकडे मेयो रुग्णालयात हे काम सोपवण्यात आले. परंतु, हे काम करताना हे दोघे मृतांच्या अंगावरील दागिने, मोबाईल व त्यांच्याकडील रोख लांबवायचे. काही दिवसांपूर्वी झिंगाबाई टाकळी येथील २२ वर्षीय अंजली नावाच्या तरुणीच्या वडिलाचे मेयोत निधन झाले. त्यांचा मृतदेह हाताळताना दोघांनी अंजलीच्या वडिलाचा मोबाईल चोरी केला.
वडिलाकडील मोबाईल गायब असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीही मेयोमधून करोनाबाधितांचे दागिने व मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
चोरट्यांचा छडा लावण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांना दिले. मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार लक्ष्मण शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. गणेश व छत्रपाल यांनी चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली.
याशिवाय या दोघांनी मेयोतून पीपीई किट, हातमोजे, इंजेक्शन व अन्य साहित्यही चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून साहित्य जप्त केले.