माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले असून त्यात खतांच्या किमतीत केलेली वाढ शेतकऱ्यावर अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. सध्या कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता ही दरवाढ का? असा सवालही त्यांनी केला आहे.
एकूणच शरद पवारांना शेतकऱ्यांची आठवण झाली हे बरे झाले असे महाराष्ट्रातील जनसामान्य म्हणत आहेत. यापूर्वी शरदरावांनी राज्यातील हॉटेल आणि बारमालकांच्या व्यथा मांडत त्यांना राज्यसरकारने मदत करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यावेळी बारमालकांकडून खंडणी मिळते म्हणून पवारांना त्यांची काळजी वाटते मात्र, तळागाळातल्या माणसाची आणि शेतकऱ्याची त्यांना चिंता वाटत नाही अशी टीका जनसामान्यांनी केली होती. त्यामुळे आता ते उशिरा का होईना पण शेतकऱयांची काळजी करताहेत हे बघून जरा बरे वाटेल.
केंद्राने जरी खतांच्या किमती वाढवल्या तरी प्रसंगी राज्यसरकार इच्छा असल्यास त्यांना मदत करू शकते. महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्याच हातात आहे. खतांचे भाव वाढले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ते खरेदी करत असलेल्या खतांवर राज्यसरकार अनुदान देऊ शकते तसे अनुदान देण्याची व्यवस्था राज्यसरकारने केली तर प्रश्नच मिटेल मात्र, पवार असे काही सांगणार नाही मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी राज्यात झालेल्या वादळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारने नुकसान भरपाई जाहीर केली होती. ती नुकसानभरपाई देखील अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगरमध्ये बोलतांना केला असल्याची बातमी आहे. हे जर खरे असेल तर गेल्यावर्षीचेच पैसे मिळाले नाही तिथे यंदा काय पैसे देणार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पवार राज्यसरकारला काहीच सांगणार नाही, कारण मग केंद्राकडे बोट दाखवायला संधी कशी मिळणार? राज्यातील महाआघाडी सरकार स्वतः काहीही करत नाही आणि प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवते त्यामुळे सरकारने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच दिलेला आहे. फडणवीसांच्या या टीकेत तथ्य निश्चित आहे. राज्यातील सरकार प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवते आहे. त्यावर समाजमाध्यमांमध्ये प्रचंड टीकाही होते आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना आदित्यच्या लग्नाचे काय झाले? असा प्रश्न विचारत आहेत आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे असे उत्तर उद्धव ठाकरे देत असतानाचे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आदित्य ठाकरेंच्या गालावर थोपटत तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी मुलगी बघायला केंद्राला सांगायचंच तेवढ बाकी ठेवलं आहे असे सांगत असतानाचेही व्यंगचित्रही बघायला मिळाले. ही टीका शरद पवार बघत आणि ऐकत नसतील असे नाही मात्र त्यांनाही केंद्रावर टीका करण्यातच धन्यता वाटते.
सद्यस्थितीत पवारांना महाराष्ट्राची काळजी असेल तर त्यांनी फक्त शेतकरीच नाही तर तळागाळातील लॉक डाऊनमध्ये रस्त्यावर आलेल्या प्रत्येक माणसाला योग्य ती मदत कशी पोहोचेल याची काळजी करण्याचे निर्देश राज्यशासनाला द्यावे तसे केले तर उभा महाराष्ट्र पवारांचा कायम ऋणी राहील.
अविनाश पाठक