नागपूर : १८ मे – समाजातील दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता येत्या १९ मे २0२१ पासून स्निक रिहॅब फाउंडेशनच्यावतीने पाच दिवसांचे एक ‘संधींना आव्हाने’ या विषयावर र्व्हच्यूअल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद््घाटन बुधवार, १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. मृदुला फडके व एमयूएचएसचे माजी कुलगुरू डॉ. पतंजली देव नायक यांच्या हस्ते होणार आहे.
स्निक रिहॅब फाउंडेशनच्या संस्थापक आणि व्यवस्थापकिय संचालिका हर्षाली खर्चे यांनी सांगितले की, स्पेशल मुले (दिव्यांग) यांच्या व त्यांच्या पालकांपुढे विविध आव्हाने आहेत. या परिषदेमधून बालकांच्या विकासाच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. यशवंत पाटील, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, एम. एस. राजलक्ष्मी, दिल्लीच्या अँक्शन फॉर ऑटिझमचे संचालक डॉ. सुमित शिंदे, डॉ. शिवानी पंडित, डॉ. झिसूझा, ए. के. कुंद्रा हे विशेष गरजा असलेल्या पालक व मुलांच्या जीवनावर परिणाम करणार्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पूनर्वसन संरचनेत सुधारणा करण्यासाठी पालक समुदायाच्या गरजा व मागण्या समजून घेणे, त्यांना योग्य त्या अद्यावत माहिती पुरविणे, मुलांच्या गरजा, मुलांच्या विकासाच्या बाजूने उपचार, थेरपी व दृष्टीकोण याबाबत पालकांना योंग्य ते मार्गदर्शन करणे आदी विषयांवर या पाच दिवसांमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये पाचशेहून अधिक पालक सहभागी होणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे.