मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाचं विचाराशी नात

बहिणाबाईंच्या काही पंक्ती मला ह्यावेळी आठवतात
मन मोकाट मोकाट, त्याला ठाई ठाई वाटा
जश्या वार्‍याने चालल्या, पान्याव्हरल्यारे लाटा
मन पाखरू पाखरू, त्याची सांगू काय मात,
खरं बघता, आपलं सगळ्यात जवळच नात असत ते आपल्या मनातल्या विचारांशी. हे नात आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकं असतं. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे ह्यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. आपल्या मनातला संवाद आपणच जपायला हवा. उदा. लहानपणी आई आपल्याला काही चूक झाली तर रागवायची तेव्हा आपण एकट्यातच स्वतःशी बोलायचो. आपणच आपल्या मनाशी आपण संवाद साधायचो.ह्याला आपण स्वतःचा स्वतःशी साधलेला संवाद असे म्हणू. तसेच आपण आपल्या मनातल्या संवादाशी लगाम नाही घातला तर मात्र त्याला भरकटायला वेळ नाही लागणार. हा सगळा आपल्या विचाराशी चाललेला संवादच होय ना. आपल्या मनातला विचार हा कधी कधी आपल्या विचारांना घडवत असतो तर कधी कधी हा बिघडवत सुद्धा असतो. जेव्हा आपल्याला अस वाटत की हा संवाद बिघडत चालला आहे तेव्हा आपण काय करतो की, एक ते पंधरा आकडे सरळ व उलट म्हणतो. किंवा एक दीर्घ श्वास घेऊन देवाचे नामस्मरण घेतो. जेणेकरून आपल्या मनातला (वि) संवाद हा दुसरीकडे वळवू शकू.
आजकाल आपण बघतो की, ह्या नवीन जनरेशन मध्ये एकटेपणा हा खूप वाढला आहे. अशावेळी मनाशी संवाद हा वाढवायला हवा. शेवटी मन हेच आपला सोबती असतो ना.
आता सोबतीचंच बघा ना, एकाची सोबत असली की असं वाटतं, अजून एकाची सोबत हवी. मग आणखी एकाची. आणि ही सोबत सतत मिळेलच अशी खात्री नाही. मग मिळाली नाही म्हणून वाटणारं दुःख. त्यापेक्षा, सोबत मिळाली तर छानच. पण नाही मिळाली तर स्व-सोबत आहेच की! ती शाश्वत आहे. नेहमीच आपल्याजवळ आहे. आपण जा म्हटलं तरी न जाणारी आहे. ही स्व-सोबत म्हणजेच स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं.
संसारात राहून अनेक नाती निभावताना असं वाटतंच ना, असे एखादे तरी नाते असावे, की ज्याला कोणतेही बंधन नसावे, जन्माने ते जोडलेले नसावे, जातीने ते बांधलेले नसावे, कर्तव्याचे बंधन नसावे, मानापमानाचे विचार नसावेत, देण्याघेण्याचे हिशेब नसावेत, फक्त प्रेम मनात असावे, सोयी गैरसोयीचे हिशेब नसावेत, पोटी आणि ओठी एकच असावे.
आपण जन्माला आल्यापासून सतत कुणाच्यातरी सहवासात असतो. त्यामुळे मनाशी बोलत जरी असलो, तरी त्याच्याशी खरी मैत्री एकांतातच होते.
हा आहे आपल्या मनातल्या मनाशी साधलेला संवाद.

पल्लवी उधोजी

Leave a Reply