प्राथमिक आरोग्य केंद्रात पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन – सुनिल केदार

नागपूर : १७ मे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वैद्यकीय जगताकडून करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा पाहता लहान मुले व बालकांसाठी ग्रामीण भागात तालुकानिहाय पॅडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळ, यंत्रसामुग्री तसेच औषध पुरवठा यामध्ये स्वयंपूर्ण करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्वला बोढारे, शिक्षण सभापती भारती पाटील, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकीत्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार उपस्थित होते.

गेल्या काही दिवसात रूग्णांचा आलेख कमी होत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. सध्या दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येते. मात्र हयगय करून चालणार नाही, असे केदार यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेचा जो अंदाज वर्तविण्यात येत आहे ते पाहता वेगाने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्थेच्या नियोजनाचे सादरीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार यांनी केले. त्यानुसार जिल्हयात प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, इमारत स्तरावर पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. या सेंटरव्दारे 130 बेड उपलब्ध होतील. त्यामध्ये नविन व प्रशस्त इमारत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्राधान्य द्यावे. बालकांच्या काळजीसाठी त्यांच्या मातांदेखील सोबत राहतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था प्रस्तावित सेंटरमध्ये किंवा त्या लगतच्या परिसरात करण्याची सूचना मंत्री महोदयांनी केली.
जिल्हयात 0 ते 6 वयोगटात 1 लक्ष 67 हजार 501, 6 ते 18 वयोगटात 4 लक्ष 5 हजार 793 अशी बालकांची संख्या असून 0 ते 18 मध्ये एकूण 5 लक्ष 73 हजार 294 बालकांची संख्या आहे. ग्रामीण भागातील पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटरच्या कामासाठी तालुका टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून तहसिलदार याचे अध्यक्ष तर तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असतील. अशी माहिती सेलोकार यांनी दिली.
पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर मध्ये लहान मुलांवर उपचार करण्यात येतील. मात्र ते करतांना नॉन-कोविड उपचार व पुरविण्यात येणाऱ्या अन्य वैद्यकीय सेवांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता तिथे कार्यरत डॉक्टरांनी घेण्याची सूचना मंत्री. श्री. केदार यांनी केली. या सेंटरमध्ये डॉक्टरांची सेवा उपलब्धता करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या दरम्यान मनुष्यबळ, औषधे, वैद्यकीय उपकरण यांची उपलब्धता करून देण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक सेंटरला सहा महिन्यासाठी 50 लक्ष रूपयांचा निधी खर्च अंदाजित आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन व जिल्हा व्यवस्थापन निधीतून हा खर्च करण्यात येईल. सध्या केलेल्या नियोजनानुसार 654 लक्ष रूपये खर्च अपेक्षीत आहे.
टेलीमेडीसीन उपचार पध्दतीव्दारे शहरातील बालरोगतज्ञ या सेंटरमधील कार्यरत डॉक्टरांना उपचार पध्दतीत मार्गदर्शन करतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मेडीकल व पॅरा-मेडीकल स्टॉफला पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या महीन्याअखेर पर्यत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार मेडीकल व मेयोमध्ये काही बेड राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी काही सूचना केल्यात. दुसऱ्या लाटेमध्ये शहरातील मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण रुग्णांना लवकर बेड मिळत नसल्याची तक्रार बहुतेक सदस्यांनी केली. ग्रामीण भागातील प्राथमिक उपकेंद्र तसेच प्राथमिक केंद्र या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड निर्माण करावे, तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कामे व्हावी, आरोग्य यंत्रणेमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये उत्तम समन्वय असावा, ग्रामीण भागातील खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना साथ रोगांमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, मेयो व मेडिकल मध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावेत, अश्या मागण्या करण्यात आल्या. या चर्चेत नाना कंबाले, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, बबलू बर्वे, आदींनी सहभाग घेतला. सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांचा प्रशासनांनी दखल घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.

Leave a Reply