मासे पकडण्यासाठी गेलेल्या नरेशचा तलावात बुडून मृत्यू

वाशिम : १६ मे : वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील येडशी कुंड येथील नरेश कांबळे यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ते मासे पकडण्यासाठी गेल्याची शक्यता असून पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तलाव खोल असल्यानं आणि पाणी गढूळ तसंच गाळ असल्यानं त्यांचे शव स्थानिकांना मिळत नव्हते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं.
नरेश कांबळे हे मंगळुरूपीर तालुक्यातील शेलुबाजार नजीक असलेल्या येडशी कुंड येथील रहिवासी होते. गावाजवळील तलावात पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळं ते बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. नरेश बुडाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण तलाव खोल असल्यामुळं आणि पाणी गढूळ तसंच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने त्यांचे शव स्थानिकांना मिळत नव्हते.
बराच वेळ प्रयत्न करुनही स्थानिकांना त्यांचं शव बाहेर काढता येत नव्हतं. त्यामुळं येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांनी वनोजा साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण केलं. त्यानंतर पथकाचे सदस्य तत्काळ साहित्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांना सोबत घेऊन विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. गाळ भरपूर असल्यानं ऑपरेशन मध्ये व्यत्यय येत होता. पण तरीही एका तासात 20 फूट खोल गढूळ पाण्यात गाळात फसलेला मृत कांबळे यांचा मृतदेह पथकाच्या सदस्यांनी स्थानिकांच्या वर काढला. यानंतर पोलिस प्रशासनाचे रितसर पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठवला.
कांबळे हे मासे पकडण्यासाठी याठिकाणी गेले असण्याची शक्यता आहे. मात्र तोल घसरून ते तलावात पडले आणि दुर्घटना घडली. यावेळी पोलीस कर्मचारी मिलिंद भगत, पोलीस पाटील गणेश बारड यांच्यासह सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. सदर रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी पथकाचे राहुल साखरे, अमर खडसे, ओम वानखडे, सतिष गावंडे, सौरव इंगोले, प्रदीप सावळे, आदित्य इंगोले यांनी सहकार्य केले. कांबळे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील कर्ताव्यक्ती निघून गेल्यानं कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Leave a Reply