फेसबुक मित्राच्या फसवणुकीविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपीला अटक

नागपूर : १६ मे – त्यांची फेसबुकवर ओळख झाली. दोघांचेही लगेच सूत जुळले. त्याने तिला भेटायला घरी बोलाविले आणि तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. नंतर लग्नाचे आमिष देऊन त्याने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध निर्माण केले. पण, युवतीने लग्नाचा तगादा लागताच त्याने नकार दिला. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून होमगार्ड जवानावर अजनी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. सूरज लक्ष्मण मडावी, असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय तरुणी ही एका खासगी हॉस्पिटलमध्ये ती आय टेक्निशियन म्हणून काम करीत होती. ऑगस्ट २0१९ मध्ये फेसबुकवरून तिची ओळख आरोपी सूरज लक्ष्मणराव मडावी ( ३१) रा. अर्जुननगर, दुर्गा मंदिरजवळ, काटोल, याच्याशी ओळख झाली. दोघांचीही चागलीच ओळख झाली. मडावी हा सुरेंद्रनगर येथे राहतो. दोघांचीही मैत्री झाल्यानंतर त्यांच्यात बाहेर फिरणे, भेटणे सुरू झाले. दोघांमध्ये प्रेमही सुरू झाले. दोघेही नेहमी भेटू लागले. एक दिवस युवती सुरेंद्रनगर येथील मडावीच्या घरी गेली होती. तेथे आरोपी मडावीने युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध होऊ लागले. युवतीने आरोपी मडावीला लग्नासाठी तगादा लावला असता, त्याने तिच्याशी लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. मिळालेल्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply