पंतप्रधानांविरोधात पोस्टरबाजी करणाऱ्या १५ आरोपींना अटक

नवी दिल्ली : १५ मे – पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी करणं काही जणांना चांगलंच महागात पडलं आहे. कोव्हिडशी लढाई करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 17 FIR नोंदवून 15 जणांना अटक केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. या पोस्टरमध्ये असं म्हटलं होतं की, ‘मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश मे क्यों भेज दिया?’. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला होता.
याप्रकरणी काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. गुरुवारी ठोस मोहिती मिळाल्यांतर पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. याप्रकरणी भादवी कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आणखी काही एफआयआर देखील दाखल होण्यची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे, जर याप्रकरणी आणखी काही तक्रारी झाल्या तर. सध्या याप्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे. कुणाच्या पाठिंब्यांने किंवा कुणाच्या सांगण्यावरून विविध शहरात ही पोस्टरबाजी करण्यात आली याबाबत तपास सुरू आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाण्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ईशान्य दिल्लीत तीन एफआयआर नोंदविण्यात आले आणि त्याठिकावरून दोन जणांना अटक करण्यात आली. पश्चिम दिल्लीत तीन एफआयआर नोंदविण्यात आले आणि बाह्य दिल्लीत आणखी तीन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. दिल्लीच्या मध्यभागी असणाऱ्या परिसातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तिथे दोन FIR दाखल करण्यात आले आहे आहेत. दोन एफआयआर रोहिणीमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे दोघांना अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्लीत एक एफआयआर नोंदवण्यात आली असून तिथे चौघांना अटक करण्यात आली आहे. द्वारका परिसरात एक एफआयआर दाखल करण्यात आली असून तिथून दोघांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर दिल्लीत एफआयआर दाखल करुन अटक करण्यात आलेल्या एकाने अशी माहिती दिली आहे की त्याला हे पोस्टर चिकटवण्यासाठी 500 रुपये देण्यात आले होते. शहाद्रा परिसरातून पोलिसांना काहीजण पोस्टर चिकटवतानाचे सीसीटीव्ही फुटेज सापलडे आहे, त्यानुसार ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सरकारच्या लसीकरण मोहिमेबाबत नाखुश असणाऱ्यांनी ही पोस्टरबाजी केल्याचं त्यावरील संदेशातून स्पष्ट होत आहे. दरम्यान यासाठी कुणी पुढाकार घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply