तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले गुन्हे रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १४ मे – तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्ध नोंदविलेले एफआयआर रद्द करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २६९, २७0, साथरोग कायद्यातील कलम ३ व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४ अंतर्गत बुलडाणा शहर पोलिस स्टेशन येथे एफआयआर नोंदविण्यात आला होता.
कोरोना महामारीमुळे सगळीकडे हाहाकार माजल्याने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या वतीने काही दिशानिर्देश जारी करण्यात आले होते. मात्र, शेख रोशन अकबर हुसैन, अब्दुल फरीद अब्दुल रेहमान, मो. खुर्शिद मो. अलिमुद्दीन, मंजूर अहमद मो. आफक, शफिक अहमद मो. युनिस, इरफान अहमद शकील अहमद, शकील अहमद मो. इब्राहिम, शेख इब्राहिम शेख हब्बू, मो. खुर्शिद शेख बाफती, अब्दुल सलिम अब्दुल रेहमान, मो. डी. इब्राहिम व सय्यद फारुख सय्यद उस्मान डोंगरे या १२ सदस्यांनी नियमांचे पालन केले नाही. हे सदस्य शहरात संचारबंदी असताना हुसेनिया मरकझ मशिदमध्ये गेले व तेथे मुक्कामी थांबले. या सदस्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली केल्याने या १२ सदस्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला. या सर्वांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दुसर्या चाचणीत केवळ ३ सदस्य पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी पॉझिटिव्हचे रिपोर्ट न्यायालयात सादर केले नाही. त्यामुळे सदस्यांना दिलासा देण्यात आला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्या खंडपीठाने तबलिगी जमातीच्या सदस्यांविरुद्धचे एफआयआर रद्द करा, असे आदेश दिले. तबलिगी सदस्यांतर्फे अँड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.

Leave a Reply