चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे – अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई : १४ मे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत विखारी टीका केली आहे. “सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या फुलप्रूफतेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे” असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, रोज सकाळी उठायचं आणि केंद्र सरकारवर बोंबा मारत सुटायचं हे राहुल गांधी यांचे धोरण अशोक चव्हाण आणि मविआच्या नेत्यांनी अंगिकारले आहे. त्यामुळेच त्यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली आहे. स्वत: काहीही करायचे नाही आणि केंद्राने केल्यावर त्यांना नावं ठेवायची हे चालणार नाही.

Leave a Reply