कोरोनाची लागण झालेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : १४ मे – दोन दिवसापुर्वी दंडकारण्यात नक्षलवादी चळवळीवर कोरोनाची दहशत पसरली होती. यामध्ये काही नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा दंतेवाडा पोलिसांनी केला होता. अशा माहिती समोर आली होती की शंभरपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान ज्याप्रमाणे वाईटातून चांगलं घडण्याचा प्रत्यय येतो तसाच काहीसा प्रकार याठिकाणी घडला आहे. गुरुवारी दंडकारण्यात कोरोनाची लागण झालेल्या दोन नक्षलवाद्यांनी बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अर्जुन ताती आणि लक्ष्मी पदा हे दोघे नक्षलवादी कांकेर जिल्हयात जंगलात नक्षलवादी चळवळीत सक्रिय होते. मात्र दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने दोघांनी कांकेर पोलीसासमोर शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिंसानी त्यांना रुग्णालयात दाखल केले असुन तिथे दोन्ही नक्षलवाद्यांवर उपचार सुरू आहेत.
बस्तरसह दंडकारण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. नक्षलवाद्यांना खरा धोका सुरक्षा दलापासून असतो यावेळी मात्र पहिल्यांदा जगाला धोक्यात आणलेल्या कोरोनाची झळ नक्षलवाद्यांनी बसली होती. दंडकारण्यात बस्तरसह तेलंगाणा, ओरोसा, आंध्रप्रदेशसह गडचिरोली जिल्ह्याचा भाग येतो. घनदाट जंगलात वावरणाऱ्या नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा बस्तर पोलिसांनी केला होता. नक्षलवाद्यांमध्ये कोरोनासोबत अन्नातून विषबाधा झाल्याने 10 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बिजानुरचे पोलीस अधीक्षक यांनी केला होता.
नक्षलवाद्यांचा वावर हा घनदाट जंगलात अतिदुर्गम भागात असतो. या भागात अनेक आदिवासी बहुल गावे आहेत, जिथे नक्षलवाद्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे माओवाद्यांकडून स्थानिक आदिवासीमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply