चंद्रपूर : १३ मे – उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीत सध्या मृतदेहांचा खच पाहायला मिळतोय. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात तर बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीत हे मृतदेह तरंगताना पाहायला मिळाले. या घटनेनंतर दोन्ही राज्यातील सरकार खडबडून जागं झालंय. या प्रकारावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाल्याची टीका केलीय.
गंगा नदीत आतापर्यंत शेकडो मृतदेह प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये दिसून आलं. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. त्यावरुन बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं म्हटलंय. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही धानोरकर यांनी केलंय.