नवी दिल्ली : १३ मे – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी करोनामुळे ४ हजाराहून अधिक जण दगावले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये कडक निर्बंध असूनही देशात दररोज साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील १८ राज्यांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर हा २० टक्क्याहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील १२ राज्यात १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर १६ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तर १८७ जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमालीची घटल्याची माहितीही त्यांनी दिली.
देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात करोना रुग्णवाढीचा दर १५ टक्क्याहून अधिक आहे. ८ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ ते १५ टक्के आहे. तर ४ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांहून कमी आहे. देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १७ कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत ८३.२६ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३ मे पर्यंत हा बरे होण्याचं प्रमाण ८१.३ टक्के इतकं होतं. देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.