चंद्रपूर : १३ मे – चंद्रपूर वनवृत्तातील मध्यचांदा वनविभाग अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रात चितळाच्या शिकार प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य तिघे जण पसार झाले असून, त्यांचा शोध वनविभागाची चमू घेत आहे. आरोपींकडून चितळाचे मुंडके, सुरी, विळा, कुऱ्हाड व 10 किलो मांस जप्त करण्यात आले आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातील सिसी नियतक्षेत्रात चितळाची शिकार केली असून, त्याचे मांस विक्री केली जात असल्याची गोपनिय माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारे सिर्सी येथील आरोपी देवराव धर्मराव सिडाम यांच्या घरी धाड टाकली असता, चितळाचे दहा किलो मांस आढळून आले. येथे किशोर भाऊराव तोडासे हा मांसाची विल्हेवाट लावत होता. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ता सजू देवराव सिडाम, अर्जून किसन आत्राम, वासुदेव मारोजी सोयाम हे पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी आरोपींविरूद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 खे कलम 2, 9, 39, 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. डी. गलगट, क्षेत्र सहाय्यक एस. एम. कटकू, पी. आर. मत्ते, वनरक्षक डि. आर. शेंडे, व्हि. सी. वाघ, डि. एम. चंदेल, एस. व्ही. मेश्राम यांनी केली.