३० हजाराची लाच स्वीकारतांना महावितरणचा अभियंता अटकेत

नागपूर : १२ मे – महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित खापा, ता. सावनेर येथील उपकार्यकारी अभियंत्याला ३0 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. गजानन बळीराम डाबरे (५४) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. ते व्यवसायाने इलेक्ट्रिक ठेकेदार आहेत. त्यांनी खापा येथील ले आऊटमध्ये तीन इलेक्ट्रिकच्या एच.टी. लाईन स्थानांतरित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या तीनही एच.टी. लाईन त्यांनी स्थानांतरित केल्या आहेत. त्याबाबतचा कम्प्लिशन रिपोर्ट त्यांनी उप कार्यकारी अभियंता यांना दिला होता. त्यामध्ये कोणतीही त्रुटी न काढता कम्प्लिशन रिपोर्ट स्वीकारून अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांना उप कार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी ३0 हजारांची लाच मागितली. तक्रारदारास डाबरे याला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून उपकार्यकारी अधिकारी गजानन डाबरे यांच्याविरुद्ध सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पडताळणीदरम्यान तक्रारदार यांच्या कम्प्लिशन रिपोर्ट त्रुटी न काढता आहे तसा स्वीकारून अहवाल देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी लाचेची मागणी केली. ११ मे रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी र्मयादित खापा ता. सावनेर येथील कार्यालयात ३0 हजार रु. लाच पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना लापलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगेहात पकडले. याप्रकरणी खापा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply