चंद्रपूर : १२ मे – बैलजोडी शोधण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दुपारी ४ वाजताच्या सुमारास चिरोली बिटात घडली. किर्तीराम देवराव कुळमेथे असे मृतकाचे नाव आहे.
मृतक आपल्या नातेवाईकासह शेतात गेला असता, वाघाने त्याच्यावर हल्ला केला. किर्तीरामला वाचविण्यासाठी त्या नातेेवाईकाने आरडाओरड केली. पण, वाघाने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा वनविभागाने केला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.
घटनास्थळी चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या मधुमती तावाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनरक्षक आर. जे. गुरनुले, एस. डी. मरस्कोल्हे, आर. व्ही. रोगे, वन्यजीवप्रेमी उमेशसिंह झिरे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जानाळा येथील वनिता वसंत गेडाम हि महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली होती. तिचा उपचारादरम्यान, मंगळवारी मृत्यू झाला.