नागपूर : १२ मे – बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला आरोपी उचारासाठी टी.बी. वॉर्डात दाखल झाला होता. पण, पोलिसांना गुंगारा देत तो तेथून निसटला. रात्रभर पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीच्या शेवटी पारडी हद्दीत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाने मुसक्या आवळल्या.
प्राप्त माहितीनुसार, खामला येथे राहणारा कृष्णा हरिदास डांगरे हा बलात्काराच्या आरोपात मध्यवर्ती कारागृहात २0१७ पासून शिक्षा भोगत होता. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल होते. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला टी.बी. झाला. त्याला उपचारासाठी टीबी वॉर्डमध्ये वॉर्ड क्र.४२ येथे भरती करण्यात आले होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस अंमलदारही ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान कृष्णा बाथरूममध्ये जाण्याचा बहाणा करून बाथरूमकडे जात होता. दरम्यान, तो पोलिसांच्या हाताला झटका मारून पळाला. आरोपी पळाल्यामुळे टीबी वॉर्डात खळबळ माजली. दोन्ही पोलिस कर्मचारी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले, पण तो गवसला नाही. पोलिसांनी लगेच या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. पेट्रोलिंग पथकांनाही याबाबत कळविण्यात आले. आरोपी रात्रभर इकडे-तिकडे भटकत राहिला. भटकता-भटकता तो पारडी हद्दीत पोहोचला. पोलिस आधीच त्याच्या शोधात होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो पेट्रोलिंग पथकाला संशयास्पदरित्या भटकताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करताच त्याने टीबी वॉर्डातून पळ काढल्याचे कबूल केले. त्याला पकडून पारडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.