नागपूर : ११ मे – वडिलांसोबत पल्सर गाडीने मागे बसून जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना मानकापूर हद्दीत सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. अलकिता महेश नुन्नारे, असे मृत मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, राणा स्कूलच्या बाजूला मानकापूर येथे राहणारे महेश शिवप्रसादर नुन्नारे हे सकाळी १0 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी अलकिता हिच्यासोबत प्लसर गाडी क्र. एमएच /३0/ एच.आर/ ४१२१ ने जरीपटका येथे जात होते. दरम्यान, मानकापूर हद्दीत मानकापूर चौक, कोराडी रोडवर बाजूला असलेला ट्रक क्र. एम.एच./0४/ सी.जी./४६४३ च्या आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीने चालवून नुन्नारे यांच्या गाडीला जबर धडक दिली. यात फिर्यादी महेश नुन्नारे गाडीसकट घासत गेले आणि अलकिता हिच्या डोक्याला जबर मार लागला. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर महेश हे जखमी झाले. याप्रकरणी तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.