गडकरींच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले

नागपूर : ११ मे – कोरोनाच्या या संकटकाळात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या पुढकारातून रुग्णांना औषधोपचार, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत आहे. कोणताही पक्षभेद न पाहता प्रत्येकाच्या मदतीला गडकरी धावून जात असून खासगी रुग्णालयांसाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनाही नितीन गडकरी यांच्या विनयशील दातृत्वाचा परिचय आला. तर त्यांच्या सहृदयनेते हिंगणघाटातील डॉक्टरही भारावून गेले.
मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांना फोन केला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डॉ. राहुल मरोठी यांचे चांगले हॉस्पिटल आहे. त्यात सध्या कोविड रुग्णांसाठी दहा खाटा आहेत. त्यांना किमान अजून २५ बेडची परवानगी मिळवून देण्याची गरज आहे. कोरोनाबाधितांची सेवा करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र जिल्हा प्रशासन परवानगी देत नसल्याचे वांदिले यांनी हेमंत गडकरी यांना सांगितले. अशावेळी ना. नितीन गडकरी हेच आपल्याला मदत करू शकतात. कृपया त्यांच्याशी बोला, अशी विनंती केली. यानंतर हेमंत गडकरी, अतुल वांदिले हे डॉक्टरांसह नितीन गडकरी यांना नागपुरातील निवासस्थानी भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत ना. गडकरी यांनी तातडीने वर्धेच्या जिल्हाधिकार्यांना फोन लावला. तसेच २५ बेडची परवानगी मिळवून दिली. शिवाय तुमच्याकडे किती व्हेंटिलेटर आहेत, अशी विचारणा केली. डॉ. मरोठी यांनी २ व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले. त्यावर ना. नितीन गडकरी यांनी मी आणखी दोन व्हेंटिलेटर देतो, ते न्या अन् रुग्णसेवा करा, असे सांगितले. दोन व्हेंटिलेटर आणि इतर साहित्य (किंमत अंदाजे २५ लाख) मिळाल्यामुळे हिंगणघाट येथील डॉक्टरांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी ही अविस्मरणीय भेट घडवून आणल्याबद्दल व रुग्णसेवेच्या दृष्टीने बाजू मांडल्याबद्दल हेमंत गडकरी व अतुल वांदिलें याचे आभार मानले.
आजच्या कोविडच्या नकारात्मक वातावरणात राजकारण, पक्षभेद या संकुचित विचाराला छेद देत काम करणारे नितीन गडकरी यांच्यासारखे नेते समाजात असल्यामुळे आजही माणुसकीचे मोल कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply