मुंबई : ११ मे – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून विरोधक व सत्ताधारी नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसत आहे. भाजपा नेते अतुल भातखळकरांनी ईडीकडे तपास गेला हे उत्तमच झाल्याचं म्हटलं आहे.
“अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी.” असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर, अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी केला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत देशमुख यांना कठोर कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र गरज पडल्यास ते तातडीचा अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी सुट्टीकालीन न्यायलयासमोर दाद मागू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.